(तवसाळ / सचिन कुळये )
कोकणातील श्रद्धा, परंपरा आणि लोककलेचा संगम असलेला, यंदा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरु झालेला श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. पंचक्रोशीतील गावांमधून पालखीची वारी पार पडत अखेर तांबडवाडी–बाबरवाडी येथे आगमन होणार आहे. या उत्सवानिमित्त कोकणच्या वैभवशाली नमन लोककलेचा जागर चार दिवस रंगणार आहे. तवसाळ गाव खुर्द, पडवे, आगर, मोहितेवाडी या मार्गाने पालखीचा प्रवास होत शेवटच्या टप्प्यात बाबरवाडी येथे दाखल होईल.
सांस्कृतिक कार्यक्रम
तांबडवाडी–बाबरवाडी गावठाण येथे चार दिवस विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत:
- रविवार, ३ मे २०२६: गण-गवळण व वगनाट्य – “गावठी शोले”
- सोमवार, ४ मे २०२६: गण-गवळण व वगनाट्य – “संघर्ष जीवनाचा”
- मंगळवार, ५ मे २०२६: गण-गवळण व वगनाट्य – “महिमा साईचा”
- बुधवार, ६ मे २०२६: गण-गवळण व “बहुरंगी नमन” संपूर्ण कार्यक्रम
या कार्यक्रमांमध्ये विनोदी फार्स, लोकनाट्य आणि पारंपरिक सादरीकरणांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
७ मे रोजी पालखी परतीचा सोहळा
गुरुवार, ७ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ तसेच आयोजकांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता ढोल-ताशांच्या गजरात पालखी परतीचा प्रवास सुरू होईल. बाबरवाडी–तांबडवाडी येथून पालखी मंदिराकडे प्रस्थान करत उत्सवाचा समारोप होणार आहे.
हा भव्य सोहळा बाबर–तांबडवाडी विकास मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील सर्व देवीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. श्रद्धा, संस्कृती आणि कोकणी लोककलेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी तवसाळमधील हा पालखी उत्सव यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.

