(मंडणगड)
तालुक्यातील टाकडे गावठाण येथे सार्वजनिक विहिरीत पोहायला गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्रज्योत प्रदीप जाधव (रा. आचोल तलाव, नालासोपारा, जि. पालघर; सध्या रा. टाकडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रज्योत सोमवारी दुपारी मित्रांसह टाकडे येथील सार्वजनिक विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही माहिती त्याची आई सरिता प्रदीप जाधव (५०) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात दिली.
या घटनेची नोंद मंडणगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संपूर्ण गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, तरुण वयातच प्रज्योतचा जीव गमावल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.