(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नागपूर–रत्नागिरी महामार्गाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोल्हापूर–रत्नागिरी मार्गाचे काम अपेक्षित वेगाने न झाल्याने त्याच्या पूर्णत्वासाठी अजून किमान दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध टप्प्यांवर कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी मंद गती किंवा ठप्प स्थितीमुळे प्रकल्प लांबणीवर पडला आहे.
सध्या कोल्हापूर ते रत्नागिरीदरम्यान अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत. वाघबीळ येथील रुंदीकरण, केल्यानजीक उड्डाणपूल, तसेच वाघबीळ दरी ओलांडून आंबवडेच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल ही कामे अद्याप पूर्णत्वापासून दूर आहेत. आंबवडे परिसरातील रस्त्याचे कामही मोठ्या प्रमाणात रखडलेले दिसते. बोरपाडळे ते पैजारवाडी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या भव्य उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असून पैजारवाडी येथील वळण रस्त्याचे कामही अपूर्ण आहे. पैजारवाडी–आवळी–बोरीवडे–खुटाळवाडी या पट्ट्यातील कामे तर अनेक दिवसांपासून ठप्प असल्याचे चित्र आहे. याशिवाय, बांबवडे–शाहूवाडी आणि शाहूवाडी–मलकापूर बायपास मार्गांची कामे कधी पूर्ण होणार, याबाबत अनिश्चितता आहे. बाणेकरवाडी ते निळे दरम्यान कडवी नदीवरील पुलासह महामार्गाचे काम मंद गतीने सुरू आहे. आंबा घाट उतरल्यावर मुर्शी–गोवरेवाडी मार्गाचे कामही ठप्प असून साखरपा येथील दोन्ही पुलांची उभारणीही थांबलेली दिसते.
दाभोळे, नाणिज आणि करंजारी परिसरातील अनेक कामे अपूर्ण किंवा अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने संपूर्ण प्रकल्पावर परिणाम होत आहे. दरम्यान, कोकणातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाळ्यात ही सर्व कामे थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामे पुन्हा सुरू होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना खड्डे, अर्धवट कामे आणि वाहतूक कोंडी यांचा सामना करत कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. परिणामी, महामार्गाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

