(दापोली /प्रतिनिधी)
तालुक्यातील केळशी फाटा मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेताच्या तारकंपाउंडवर आदळले आणि त्यात चालक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन महादेव लोखंडे (वय ४६, रा. रोवले, बौद्धवाडी, ता. दापोली) हे दि. २७ मार्च रोजी रात्री देव्हारेहून केळशी फाटा मार्गे आपल्या घरी जात होते. त्यांच्या ताब्यातील निळ्या रंगाची होंडा डिओ १२५ ( क्रमांक MH 08 BH 8346) ही दुचाकी भरधाव वेगाने चालवत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरत जाऊन स्थानिक शेतकरी श्री. माने यांच्या शेतीच्या तारकंपाउंडला धडकले. या धडकेत सचिन लोखंडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्याद नारायण यशवंत आले (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, बाणकोट सा. म. पो. ) यांनी दिली आहे. वाहनचालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालविल्याने स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संगीता अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

