( रत्नागिरी / वार्ताहर )
मंडणगड तालुक्यातील अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला मंडणगड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव दीपक अंकुश गर्जे (वय ४२) असे आहे.
अभ्यासाच्या निमित्ताने संपर्क, नंतर आक्षेपार्ह संदेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षकाची ओळख विद्यार्थिनीच्या भावामार्फत झाली होती. अभ्यासाशी संबंधित माहिती देण्याच्या निमित्ताने त्याने विद्यार्थिनीशी मोबाईलवर संपर्क सुरू केला. तक्रारीनुसार, ४ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने विद्यार्थिनीच्या घरातील एका नातेवाईकामार्फत बाईलवर वारंवार आक्षेपार्ह आणि अयोग्य आशयाचे संदेश पाठवले. या संदेशांमुळे विद्यार्थिनीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप आहे.
विद्यार्थिनीने जतन केले पुरावे
सततच्या त्रासामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थिनीने आरोपीकडून आलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट जतन केले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. संदेश पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने १३ जुलै रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोक्सोअंतर्गत गुन्हा; आरोपी अटकेत
तक्रारीची गंभीर दखल घेत मंडणगड पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी शिक्षकाविरुद्ध बीएनएस आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.
डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा मोबाईल आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी तिच्या आजीचा मोबाईल वापरत असल्याचे समजते. शाळेतील अभ्यास, पालकसभा आणि इतर शैक्षणिक माहिती देण्यासाठी शिक्षकांकडून याच मोबाईलवर संदेश पाठवले जात होते. मात्र, याच माध्यमाचा गैरवापर करून आरोपीने आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
भाजपकडून कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, मंडणगड तालुका यांच्या वतीने मंगळवारी (१४ जुलै) मंडणगड पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक, तालुका सरचिटणीस अॅड. सुशील दळवी, शहराध्यक्ष आनंद नारकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी यंत्रणा आणि सतर्कता आवश्यक असल्याची भावना पालक व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

