(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार असून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे निकाल प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. मात्र आता हा संभ्रम दूर झाला असून 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत.
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थी
या संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाइन पाहता येतील तसेच त्याचा प्रिंटआउट घेण्याची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय DigiLocker अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका साठवण्याची सोय करण्यात आली आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 3 मे ते 17 मे 2026 या कालावधीत सुरू राहील. विद्यार्थी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरू शकतात. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कामकाजाच्या दिवसांत अर्ज करणे आवश्यक राहील.
तसेच, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी (Class Improvement Scheme) पुढील तीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 या सत्रांचा समावेश आहे. याशिवाय जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रकाबाबत स्वतंत्र परिपत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यावर्षी राज्यभरातून एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली आणि 18 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून हे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आली होती आणि संपूर्ण राज्यात 3387 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
निकालाच्या दिवशी संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने सर्व्हर स्लो होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई न करता संयमाने अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल पाहावा, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

