(मुंबई)
अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील अशोक ॲकॅडमी लेन येथील एका आठ मजली इमारतीत शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १०४ मध्ये ही दुर्घटना घडली. आगीत अभिना संजनवालिया (३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १० दिवसांचे बाळ आणि तीन वर्षांच्या मुलासह सहा जण जखमी झाले आहेत.
घरातील सदस्य झोपेत असताना अचानक आग लागल्याने काही काळ कोणालाही याची जाणीव झाली नाही. क्षणार्धात आगीने उग्र रूप धारण केले व धुराने संपूर्ण परिसर व्यापला. यामुळे रहिवाशांनी आरडाओरड करत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काहीजण सुखरूप बाहेर पडले, तर काहीजण धुरामुळे अडकले.
अपर्णा गुप्ता (४१), दया गुप्ता (२१), रीहान गुप्ता (३), १० दिवसांचा प्रदुम्ना, कार्तिक संजय वालिया (४०), आणि पोलम गुप्ता (४०) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. धुरामुळे बचावकार्यात अडचणी आल्या, मात्र जवानांनी पराकाष्ठा करत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.
जखमींना कोकिलाबेन, कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभिना वालिया यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलम गुप्ता यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, इतर जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत.
या आगीत सदनिकेतील विद्युत यंत्रणा, वातानुकूलित यंत्र, लाकडी फर्निचर, कपडे व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दलाकडून तपास सुरू आहे.