(धाराशिव)
ऐन दिवाळीच्या सणात आनंदाच्या वातावरणावर काळाने झडप घातली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन महागड्या गाड्यांची समोरासमोर भीषण धडक होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. सफारी आणि ग्रँड वितारा या दोन आलिशान गाड्यांचा वेगात झालेला अपघात इतका जबरदस्त होता की, दोन्ही वाहनांचे पूर्णपणे चक्काचूर झाले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, सफारी गाडीचा चालक अतिवेगाने जात असताना रस्त्यावर अचानक एक कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडर तोडत विरोधी लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या ग्रँड वितारा गाडीला जोरदार धडकली.
या अपघातात सफारी गाडीतून प्रवास करणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर ग्रँड वितारा गाडीत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत झालेले चारही जण बिदर येथील रहिवासी असून, जखमी झालेले दोघे सोलापूर येथील आहेत. जखमींवर सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी रवाना करण्यात आले असून, ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दिवाळीच्या सणात घडलेल्या या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

