(ठाणे / डोंबिवली)
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना न्यायालयाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
उपचारादरम्यान झालेल्या वादातून हल्ला
गरोदर महिलेच्या उपचारादरम्यान झालेल्या वादानंतर काही जणांनी थेट शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून डॉक्टर, महिला डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली. निषेध म्हणून केडीएमसीच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या. या घटनेनंतर विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मुख्य आरोपी रमेश म्हात्रे याला अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हृदयविकाराशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे आणखी तीन आरोपी अटकेत
या प्रकरणात रमेश म्हात्रेचा खासगी अंगरक्षक रमेश लक्ष्मण पवार (50), प्रकाश उद्धव निकम (35) आणि अक्षय शरद कारंडे (30) यांना रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश म्हात्रेने रुग्णालयात घुसल्यानंतर डॉक्टरांना शिवीगाळ करत डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केली. तसेच दोन परिचारिकांशीही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे.
राज्यभरातील डॉक्टर संघटनांचा तीव्र निषेध
या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तसेच विविध वैद्यकीय संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अटकेसाठी वाढला होता राजकीय दबाव
घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि नागरिकांनी रमेश म्हात्रेच्या अटकेची मागणी केली होती. केडीएमसीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देत डॉक्टरांची भेट घेतली. तसेच बुधवारी रात्रीपर्यंत आरोपीला अटक झाली नाही तर महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला होता.
आदित्य ठाकरे यांची कठोर भूमिका
उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही रुग्णालयाला भेट देत मारहाण झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांशी संवाद साधला. “कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. केवळ अटक करून चालणार नाही, तर संबंधित नगरसेवकाला पदावरून हटविण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
श्रीकांत शिंदे यांची शिस्तभंग कारवाईची घोषणा
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या घटनेचा निषेध करत, “डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाणार नाही. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट केले. शिवसेनेकडून त्याला शिस्तभंगाची नोटीसही बजावण्यात आली आहे. राज्यभरातून वाढलेल्या दबावानंतर अखेर बुधवारी संध्याकाळी विष्णूनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे याला अटक केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आज (गुरुवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना रमेश म्हात्रे म्हणाले, “शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेबद्दल मला खेद आहे. मात्र, मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की, संबंधित महिला डॉक्टरवर मी कोणत्याही प्रकारे हात उचललेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसत आहे, ते कॅमेऱ्याच्या अँगलमुळे तसे भासत आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी त्या महिला डॉक्टरशी बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. तिची वैवाहिक स्थिती काय आहे, हेही मला माहीत नव्हते. आम्ही रुग्णांच्या अडचणी मांडण्यासाठी गेलो असताना त्या सतत मोबाईलवर बोलत होत्या आणि आमचे म्हणणे ऐकत नव्हत्या. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मी केवळ त्यांच्या हातावर हलकेच टॅप केले. कोणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता.”
‘बाळासाहेबांची शिकवण; महिलांवर हात उचलणार नाही’
स्वतःची बाजू मांडताना रमेश म्हात्रे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण लाभली आहे. महिलांचा सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे. आम्ही कधीही कोणत्याही महिलेवर हात उचललेला नाही आणि भविष्यातही उचलणार नाही.”
यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत, “शास्त्रीनगर रुग्णालयातील व्यवस्थेतील त्रुटींमुळे हा संपूर्ण प्रकार घडला. रुग्णांना योग्य सेवा मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा व्हाव्यात, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू,” असेही म्हटले.

