(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी–नागपूर मार्गावरील देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला धडक देऊन चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार वाहनचालकाला देवरुख व साखरपा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पकडत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
देवळे फाट्यावर प्रवाशांची वाट पाहत उभे असलेल्या रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय ६२) यांच्या रिक्षाला मागून भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा सुमारे दहा फूट दूर फेकली गेली आणि कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच देवरुख आणि साखरपा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहन (MH 09 GA 6886) ओळखण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत आंबा घाट परिसरात अवघ्या काही तासांत चालकाला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, तसेच पोलीस हवालदार सचिन कामेरकर आणि सचिन पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

