(देवरूख / सुरेश सप्रे)
धामणी ग्रामपंचायत मध्ये वॉटर कुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तूंची खरेदी दाखवून एकही वस्तू ग्रामपंचायतमध्ये नाही, हा गंभीर प्रकार आहे. याची आमसभेत जोरदार खडाजंगी झालेवर संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना आजच्या आज सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचे आदेश आम. शेखर निकम यांनी दिले.
धामणी ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अधिकारी नेमुन तातडीने कारवाई करावी असे पत्र दिनांक १४ ॲागस्ट २०२५ रोजी गटविकास अधिकारी यांनी देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही नाही याबाबत प्रविण गुरव व श्रीनिवास पेंडसे यांनी मुद्दा आमसभेत उपस्थित केला असता उद्याच याबाबत कार्यवाहीचे आदेश आमदारांनी दिले.
ग्रामपंचायतीने आपल्या अधिकारात वॉटर कुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तुंची खरेदी केली. परंतु त्यातील एकही वस्तू ग्रामपंचायत मध्ये नाही हा धक्कादायक प्रकार आहे, याची प्रशासनाने दखल न घेता संबधीतांना पाठीशी घालत असल्याचा निषेध करत ग्रामपंचायत सदस्य यांनी राजीनामे दिले होते. तरीही याचे गांभीर्य लक्षात न घेता अशांना पाठीशी घातले जात असलेच बाब श्रीनिवास पेंडसे यांनी आमसभेत निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार महोदयांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करून निलंबित करण्याचे आदेश दिले असल्याने आमसभेत एकच खळबळ उडाली.
यावर खरोखरच चौकशी होवून संबधीतांनावर कारवाई होते की त्यांना थातूरमातूर चौकशी करुन पाठीशी घातले जाते याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

