(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरवंडे, ता. मालवण येथील विजय पवार हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून चेहऱ्याच्या उजव्या बाजूला होणाऱ्या तीव्र वेदनांनी त्रस्त होता. हसताना, जेवताना किंवा दात घासतानाही त्याला असह्य वेदना होत असल्याने त्याचे दैनंदिन आयुष्यच विस्कळीत झाले होते.
काही महिन्यांपासून विविध ठिकाणी उपचार घेऊनही वेदना कमी न झाल्याने अखेर त्याने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांची भेट घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आलेल्या एमआरआय तपासणीत मेंदूतून चेहऱ्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नसांवर रक्तवाहिनीचा दाब येत असल्याचे निदान झाले. ही नस चेहऱ्याला संवेदना देण्याचे काम करते. त्या नसांवर दाब येत असल्याने विजयला बोलताना, हसताना आणि जेवताना तीव्र वेदना होत होत्या.
या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ असे म्हणतात. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन’ ही शस्त्रक्रिया करण्यात येते. डॉ. मृदुल भटजीवाले यांनी कानाच्या मागील बाजूस छोटा छेद देत दुर्बिणीच्या सहाय्याने मेंदूमधील संबंधित नस शोधून काढली. त्यानंतर नस व तिला दाब देणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये स्पंजसारखा टेफ्लॉन पॅच बसवून नसांवरील दाब कमी करण्यात आला.
मेंदूशी संबंधित असल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची मानली जाते. मात्र ती यशस्वीरीत्या पार पडल्याने विजयच्या चेहऱ्यावरील वेदना तात्काळ कमी झाल्या. शस्त्रक्रियेनंतर तो पहिल्यांदाच कोणतीही वेदना न होता हसू आणि जेवू शकला.
गेल्या दोन वर्षांत वेदना कमी करण्यासाठी विजयला अनेक औषधे घ्यावी लागत होती. त्यातून त्याचा रक्तदाबही वाढला होता. मात्र या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या सर्व तक्रारी काही मिनिटांतच कमी झाल्या. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली.
वालावलकर रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा क्लिष्ट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जात असल्याने डेरवण येथील हे रुग्णालय कोकणवासीयांसाठी मोठा आधार ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

