(संगमेश्वर / एजाज पटेल)
गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत डिंगणी येथील वाहन चालक फरीद मापारी यांच्या कन्या तमन्ना मापारी हिने विज्ञान शाखेची पदवी (B.Sc.) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे डिंगणीसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
तमन्नाचे वडील फरीद मापारी हे व्यवसायाने वाहन चालक असून, दिवसभर कष्ट करून त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी तमन्नाच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. त्यांच्या कष्टाचे चीज करत तमन्नाने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही पदवी मिळवली.
नुकताच संगमेश्वर लोवले येथील नवनिर्माण सीनिअर कॉलेजमध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारंभात तमन्नाने पदवीधराचा मानाचा काळा गाऊन आणि टोपी परिधान करत प्रमाणपत्र स्वीकारले. हा क्षण तिच्यासाठीच नव्हे, तर तिच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक ठरला.
या समारंभात संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्या हस्ते तमन्नाचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठ रत्नागिरी सब कॅम्पसचे डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. संजना चव्हाण, डॉ. प्रज्ञा कदम यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना तमन्नाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना तमन्ना म्हणाली, “या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांना जाते. त्यांनी कठीण परिस्थितीतही माझ्या शिक्षणासाठी झटून साथ दिली. ही पदवी त्यांच्या कष्टाला आणि आईच्या पाठबळाला समर्पित आहे.”
दरम्यान, लेकीचा सन्मान होताना पाहून फरीद मापारी भावूक झाले. “मी साधा वाहन चालक आहे. मात्र, मुलीच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्न केले. आज तिचं यश पाहून माझे कष्ट सार्थकी लागल्याची भावना आहे,” असे त्यांनी सांगितले.
तमन्नाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कसबा ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. तिच्या या यशाबद्दल डिंगणी गावातून आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

