( मुंबई )
मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला राजा शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेच्या शिखरावर पोहोचला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा भव्य सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होत असून ऍडव्हान्स बुकिंगमध्येच त्याने दमदार कामगिरी नोंदवली आहे.
चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत मराठी आणि हिंदी मिळून ६० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः महाराष्ट्रात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कथा असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाशी भावनिक नाते निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर तिकिटांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. रिपोर्टनुसार, केवळ मराठी आवृत्तीतच ५८ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत, तर हिंदीतही हजारो तिकिटांची नोंद झाली आहे.
ब्लॉक बुकिंगसह चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठा व्यवसाय केल्याचे सांगितले जात आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ मेच्या सार्वजनिक सुट्टीचाही चित्रपटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होत असल्याने देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटातील स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून संजय दत्त अफझल खानच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जिनिलिया डिसूझा आणि जितेंद्र जोशी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
दरम्यान, सलमान खान यांच्या कॅमिओचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, ते जिवा महालाची भूमिका साकारणार असून अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक लढाईच्या प्रसंगात त्यांची झलक पाहायला मिळू शकते. एकूणच, रिलीजपूर्वीच मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘राजा शिवाजी’ हा २०२६ मधील मोठा ब्लॉकबस्टर ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

