(पालघर)
पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम भागात लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसी आणि तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना विरार पश्चिम येथील न्यू वीवा कॉलेजजवळ असलेल्या ‘पूनम आकांक्षा’ इमारतीत बुधवारी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात नॅन्सी मिश्रा (वय 24) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीचे नाव शिवम उपाध्याय असे असून तो गंभीर जखमी अवस्थेत सापडला.
दोन वर्षांचे संबंध, प्रस्ताव नाकारल्याने संताप
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी यांच्यात मागील दोन वर्षांपासून संबंध होते. काही दिवसांपूर्वी आरोपी आपल्या कुटुंबासह विवाहाचा प्रस्ताव घेऊन तरुणीच्या घरी गेला होता. मात्र, आई आणि मुलीने हा प्रस्ताव नाकारल्यानंतर आरोपी संतापला. त्याच रागातून त्याने दुसऱ्याच दिवशी घरात घुसून चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःलाही जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा ऐकून पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विरारमधील या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नातेसंबंधातील वादातून घडलेल्या या घटनेने समाजमन हादरले आहे.

