(ठाणे)
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थानमधील झुंझुनू येथे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आणत सुमारे १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
तीन महिन्यांपूर्वी मिरा-भाईंदर शहरात पोलीस गस्तीदरम्यान संशयावरून सहा जणांची झडती घेण्यात आली होती. या कारवाईत त्यांच्याकडून ५०१.६ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ कोटी ३२ हजार रुपये किमतीचा एमडी ड्रग्स, आठ मोबाईल फोन आणि चार मोटारसायकली असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला होता.
तपासादरम्यान या गुन्ह्यातील आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि सहा मोबाईल फोन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर फरार आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथक राजस्थानला रवाना झाले.
१४ डिसेंबर २०२५ रोजी राजस्थानमधील झुंझुनू येथे अनिल विजयपाल सिहाग यांच्या मालकीची एमडी ड्रग्स निर्मिती करणारी फॅक्टरी उघडकीस आली. पोलिसांनी कोंबडी पालनच्या मोठ्या अवाढव्य शेड मधील बांधकामात चालत असलेला एमडी उत्पादनाचा कारखाना शोधून काढला. या ठिकाणाहून सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, एमडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्री-कर्सर रसायने, तसेच फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशीन, वजन काटे, हँड ग्लोव्हज, फिल्टर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत १०० कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली असून त्यात दाऊद टोळीतील गुंडांचा सहभाग आहे. यातील अटक ११ पैकी ९ आरोपी हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आहेत. ह्यातील काहीजण हे डी गँगशी संबंधित आहेत. हत्या, दहशतवादी कृत्य पासून विविध गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. याबाबत आणखी तपास सुरु आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

