(पुणे)
भारतीय सैन्यात महिलांच्या वाढत्या सहभागाला नवी उंची देत लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी ‘आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन’ (AMAR) हा अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करत भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.
पुण्यातील कठीण प्रशिक्षणाला यशस्वी पूर्णविराम
हा प्रतिष्ठित कोर्स पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग (AIPT) येथे घेतला जातो. भारतीय सैन्यातील सर्वात कठीण कोर्सेसपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणात शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक ताकदीची कठोर परीक्षा घेतली जाते. दीक्षा त्रिपाठी यांनी केवळ हा कोर्स पूर्ण केला नाही, तर उत्कृष्ट कामगिरी करत विशेष कौतुकही मिळवलं आहे.
लडाखमध्ये पोस्टिंग, जिद्दीची ओळख
सध्या त्यांची नियुक्ती लडाखसारख्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील भागात आहे. भारतीय लष्कराच्या ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ने त्यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक करत त्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीला सलाम केला आहे.
महिलांचा वाढता दबदबा भारतीय सैन्यात
गेल्या काही वर्षांत भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची भूमिका वेगाने विस्तारत आहे. पॅराशूट जंपिंग, लांब पल्ल्याच्या धावा आणि सागरी मोहिमांमध्ये महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये मेजर दीक्षा सी. मुदुदेवन यांनी ‘बलिदान बॅज’ मिळवून इतिहास घडवला होता. आज महिला अधिकारी आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशनसारख्या महत्त्वाच्या विभागांत कार्यरत आहेत.
काय आहे ‘AMAR’ कोर्स?
‘AMAR’ (Army Martial Arts Routine) कोर्सची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली. आधुनिक युद्धपद्धती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा कोर्स सैनिकांना समोरासमोरील लढाईसाठी सक्षम बनवतो.
या प्रशिक्षणामध्ये खालील बाबींवर विशेष भर दिला जातो:
- शस्त्रांशिवाय लढाई (Unarmed Combat)
- शस्त्रांचा प्रभावी वापर
- स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढवणे
- मानसिक कणखरता विकसित करणे
अचानक युद्धजन्य परिस्थितीत, विशेषतः जिथे शस्त्रांची उपलब्धता मर्यादित असते, तिथे सैनिकांनी कसा सामना करावा याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. तसेच उंच पर्वतीय भागातील परिस्थिती लक्षात घेऊन याची रचना करण्यात आली आहे.
लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नाही, तर देशातील प्रत्येक तरुणीला मोठं स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे.

