(नवी दिल्ली)
देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असलेल्या आधार कार्ड मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. UIDAI कडून आधार कार्डच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, नागरिकांची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे.
नवीन आधार कार्डचे स्वरूप सध्याच्या कार्डपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे. आधीप्रमाणे नाव, पत्ता आणि 12 अंकी आधार क्रमांक कार्डवर दिसणार नाही. त्याऐवजी कार्डवर केवळ नागरिकाचा फोटो आणि एक सुरक्षित QR कोड असेल. या QR कोडमध्ये सर्व वैयक्तिक माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात साठवलेली असेल. नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार क्रमांक ही माहिती केवळ अधिकृत ॲप किंवा सरकारी स्कॅनरद्वारेच वाचता येईल. त्यामुळे कार्ड हरवले किंवा कुठेही दिले तरी अनधिकृत व्यक्तीला माहिती मिळण्याचा धोका जवळपास नाहीसा होईल.
आधारच्या झेरॉक्स प्रती देताना डेटा लीक होण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अनेक संस्था आधारच्या प्रती साठवून ठेवतात, ज्यामुळे गैरवापराची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर नवीन डिझाइनमुळे नागरिकांची गोपनीयता अधिक सुरक्षित राहील आणि फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सरकारकडून डिजिटल आधार वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. UIDAI ने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत मोबाइल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे आधार तपशील सुरक्षितपणे शेअर करता येतात. नव्या डिझाइनमुळे ही डिजिटल व्यवस्था अधिक मजबूत होणार असून पडताळणी प्रक्रिया जलद आणि सुलभ होईल.
नवीन प्रणाली लागू होईपर्यंत नागरिकांनी शक्यतो डिजिटल आधारच वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच अनोळखी ठिकाणी आधारची झेरॉक्स देताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सरकार Aadhaar Vision 2032 अंतर्गत डेटा सुरक्षा आणि गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहे. त्यामुळे येत्या काळात आधार अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

