(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पॅलेट गनच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी, “आपले विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” असा थेट सवाल केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचे आदेश कुणी दिले, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी संसदेत केली.
परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सल्लागार बदलायला हवेत. जेन-झी पिढीचा विश्वास जिंकायचा असेल, तर केवळ कॅमेऱ्याचा अँगल बदलून चालणार नाही, मनाचाही अँगल बदलावा लागेल. त्यांना स्त्यावरून हटवले जाऊ शकते, पण त्यांच्या प्रश्नांना हटवू शकत नाही. देशातील युवकांची मने जिंकण्यासाठी मंत्र्यांनी इन्स्टाग्रामवर रील करून भागणार नाही”. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ गदारोळ झाला.
नीट पेपरफुटीविरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याचा निर्णय कुणाचा होता? आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याची परवानगी कुणी दिली?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या सर्व प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशासमोर द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, “देशातील विद्यार्थी न्यायासाठी आंदोलन करत आहेत. मग त्यांच्याशी दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक का दिली जाते? जनता सरकारकडून उत्तर मागत आहे, मात्र उत्तर मिळत नाही,” असेही त्या म्हणाल्या.
भाषणादरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही टीका केली. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रियंका गांधी यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचा दावा करत ते संसदेच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली. तसेच त्यांनी प्रियंका गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी, अशीही मागणी केली.
दरम्यान, परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आमचा पक्ष परीक्षा सुधारणा विधेयकाला पाठिंबा देतो. मात्र सरकारचे काम घोषणांवर नव्हे, तर निकालांवर मोजले जाते,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी, “सरकार दरवर्षी नवीन परीक्षा प्रणालीचे आश्वासन देते. पण विद्यार्थ्यांना दरवर्षी तोच घोटाळा पाहावा लागतो. परीक्षांची नावे बदलतात, पीडित बदलतात, आरोपी बदलतात; मात्र गैरप्रकार कायम राहतात,” अशी टीकाही केली.
नीट पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधकांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली, तर सत्ताधारी पक्षाने सरकारची भूमिका मांडत विरोधकांच्या आरोपांना फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला.

