(नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडीद्वारे करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) ने प्राथमिक तपास पूर्ण केला असून पहिल्या अहवालात 150 शिक्षकांची नावे समोर आली आहेत. या शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली असून त्यांचे वेतनही तात्काळ थांबवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक तपासाच्या रडारवर
राज्यात गाजत असलेल्या या प्रकरणी सुरुवातीला नाशिकचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चौधरी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत झालेल्या तपासात जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकेतील अनेक शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक तपासाच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणातील अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भाऊसाहेब चौधरी यांच्याही भूमिकेची चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे येथील एसआयटी पथकाकडून करण्यात येत असून तपासाचा अहवाल शिक्षण विभाग आणि संचालकांकडे सादर करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात 150 शिक्षकांवर कारवाई
एसआयटीच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील 150 शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वेतनही थांबवण्यात आले आहे. पुढील तपासात आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या भरती प्रकरणात सुमारे दोन हजार शिक्षक, कर्मचारी, अधिकारी आणि संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 15 शिक्षण संस्थांची तपासणी करण्यात आली असून चौकशी अद्याप सुरू आहे. या प्रकरणी 59 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीकडून शिक्षकांची मान्यता, शालार्थ आयडी तसेच रुजू अहवाल यांची सखोल तपासणी केली जात आहे. या घोटाळ्यात शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या प्रकरणात काही शिक्षकांवर कारवाई झाली असली तरी संबंधित संस्थाचालक आणि शिक्षण अधिकारी अद्याप मोकाट असल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, एसआयटीच्या तपासाचा पुढील अहवाल येत्या काळात सादर होणार असून या घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

