(मुंबई)
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार विषबाधेचा संशय व्यक्त केला जात असताना, मृतांच्या शरीरात ‘पेनकिलरसदृश’ घटक आढळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जेजे रुग्णालय प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे नेमके मृत्यूचे कारण फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात मृत्यू विषबाधेमुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत तपास यंत्रणा विविध शक्यतांचा तपास करत आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. यात कलिंगड, बिर्याणी-पुलाव, मसाले, कच्चा तांदूळ, दालचिनीसारखा पदार्थ मिसळलेले पाणी तसेच अर्धवट खाल्लेले खजूर यांचा समावेश आहे. या सर्व नमुन्यांचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या दुर्दैवी घटनेत अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा व झैनब यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने रात्री नातेवाईकांसोबत बिर्याणीचे जेवण केले होते आणि त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. मात्र सकाळी अचानक सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर कलिंगडामुळे विषबाधा झाल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या असून त्याचा थेट परिणाम वाशी APMC फळ बाजारावर दिसून येत आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या कलिंगडाच्या मागणीत अचानक घट झाली असून विक्री जवळपास निम्म्यावर आली आहे. सध्या बाजारात दररोज 4 ते 5 हजार क्विंटल कलिंगडाची आवक होत असली, तरी त्यापैकी केवळ 70 ते 80 टक्के मालाचीच विक्री होत आहे. उर्वरित माल साठून राहत असल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.
याशिवाय पश्चिम आशियातील तणावामुळे कलिंगडाची आखाती देशांकडे होणारी निर्यात कमी झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात पुरवठा वाढला असून, मागणी घटल्याने दरही घसरले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे.
एकूणच, पायधुनीतील या मृत्यू प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच या घटनेमागील खरी कारणमीमांसा समोर येणार आहे. तोपर्यंत या घटनेभोवतीचे गूढ कायम राहणार आहे.

