(मुंबई)
बिग बॉस मराठीचा विजेता आणि तरुणांचा लाडका अभिनेता शिव ठाकरे यांच्या मुंबईतील घराला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिव ठाकरेच्या गोरेगाव येथील कोलते पाटील व्हर्व्ह बिल्डिंगमधील घरात एक दुर्घटना घडली. या आगीत संपूर्ण घर जळून राख झाले आहे. शिव ठाकरे आणि त्याचे कुटुंबीय सुखरुप आहेत. या दुर्घटनेनंतर शिवच्या टीमकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. संघर्षातून यशाकडे प्रवास करत अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शिवने स्वतःचे घर विकत घेतले होते. मात्र, त्या घरात अचानक लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले असून, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरेचा फ्लॅट कोल्टे पाटील व्हर्व्ह या निवासी संकुलात असून, काल सकाळी अचानक आग लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये घरातील अनेक वस्तू जळाल्याचे स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटनाकाळात शिव मुंबईत नव्हता. परदेशातून परतत असताना त्याने विमानतळावरून फोटो शेअर करत “Back to Mumbai” असे लिहिले होते. याच दरम्यान घरात आग लागल्याची माहिती समोर आली.
शिवने मुंबईत घर घेतल्याची आनंदवार्ता त्याने झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये शेअर केली होती. “मुंबईत घर घेणं म्हणजे आयुष्यभराची कमाई,” असे सांगत त्याने आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी जज फराह खान यांनी त्याच्या घरात पूजा करून गणपतीची मूर्ती भेट दिली होती.
शिव ठाकरे कोण?
महारাষ্ট্রातील एका साध्या गावातून मुंबईपर्यंतचा शिव ठाकरेचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. रोडीजमधून ओळख मिळवत त्याने बिग बॉस मराठी जिंकले, तर बिग बॉस 16मध्येही त्याची दमदार उपस्थिती देशभर चर्चेत आली. याशिवाय खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जामधील त्याचे परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. अलीकडेच तो रश्मी देसाईसोबत ‘रज्ज रज्ज नाचंन’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकला.

