(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीवर पुण्यातील तब्बल ४० एकर सरकारी वतन जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली असून, “या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मला या व्यवहाराची माहिती नव्हती,” असे स्पष्ट करत त्यांनी संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार म्हणाले, “मला गेली ३५ वर्षे महाराष्ट्राची जनता ओळखते. मी कधीही नियमांच्या बाहेर जाऊन काम करत नाही, आणि अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चर्चा ऐकली होती. तेव्हा मी स्पष्ट सांगितले होते की, अशा प्रकारच्या गोष्टी मला मान्य नाहीत. मात्र त्यानंतर काय घडले हे मला माहीत नाही. त्यामुळे आता मी सर्व कागदपत्रे तपासून वस्तुस्थिती समोर आणणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, माझ्या नावाचा वापर करून कोणतेही काम करू नये. माझ्या कोणत्याही नातेवाईकांना लाभ मिळावा म्हणून मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही.”
अर्थमंत्री म्हणून काम करताना नियमपालनाचे महत्त्व अधोरेखित करत पवार म्हणाले, “मी स्वतः अर्थमंत्री म्हणून काम करत असताना सर्वांनी नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे अशीच माझी अपेक्षा आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. मी कायद्याने चालणारा माणूस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवतो. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहे.”

