(मुंबई)
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या मुलीने किडनी दान करून नवजीवन दिल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर असलेल्या शिवतारे यांच्यावर मुंबईत यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली.
आमदार शिवतारे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना, त्यांची मुलगी डॉ. ममता विजय शिवतारे पुढे आली. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबात आशेचा किरण निर्माण झाला. अशा कठीण प्रसंगी पित्याचे दुःख न पाहवल्याने डॉक्टर असलेल्या ममता यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जन्मदात्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
सोमवारी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. ऑपरेशननंतर वडील आणि मुलगी दोघांचीही प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे.
भावनिक बाप-लेकीचे नाते
मुलगी आणि वडील यांच्यातील प्रेमळ नात्याचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे. एका मुलीने आपल्या वडिलांसाठी केलेला हा त्याग केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता समाजासाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ममता यांना ‘देवदूत’ म्हटले जात आहे.
विजय शिवतारे हे शिवसेनेचे नेते असून 2009 आणि 2014 मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्ये पराभवानंतर 2024 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. राजकारणात सक्रिय असतानाच त्यांची तब्येत बिघडली होती.
ममता शिवतारे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलाला महत्त्व दिले जाते, अशा काळात ममता शिवतारे यांनी लेकीचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. पुरंदरच्या मातीतील या लेकीने दाखवलेले हे धाडस आणि प्रेम पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या घटनेमुळे “देव प्रत्येकाच्या घरी येत नाही, म्हणून तो लेकीच्या रूपात दूत पाठवतो” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एका लेकीच्या त्यागामुळे केवळ एका वडिलांना नवजीवन मिळाले नाही, तर समाजालाही एक सकारात्मक संदेश मिळाला आहे.

