(मुंबई)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या ड्रग्ज साम्राज्याचा प्रमुख समन्वयक मानला जाणारा सलीम डोला (वय 59) याला बुधवारी सायंकाळी मुंबईत आणण्यात आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आज (गुरुवारी) त्याला विशेष NDPS न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करणार आहे.
टर्कीत अटक, भारतात प्रत्यार्पण
दीर्घकाळ फरार असलेल्या सलीम डोलाला इस्तंबूल येथे टर्कीची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली होती. त्यानंतर अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. डोलाला प्रथम दिल्लीत आणून पटियाला कोर्टात हजर करण्यात आले, जिथे त्याला ट्रान्झिट रिमांड मिळाली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमधील ‘मोठा मासा’
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सलीम डोला हा भारतासह अनेक देशांत पसरलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचा मुख्य दुवा होता. त्याचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल्सशी असल्याचेही उघड झाले आहे. 1998 मध्ये मुंबई विमानतळावर 40 किलो मँड्रॅक्ससह त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो पुन्हा फरार झाला आणि परदेशातूनच ड्रग्ज नेटवर्क चालवत राहिला.
फेंटॅनिल आणि MD तस्करीत सहभाग
डोलाचे नाव हजारो कोटी रुपयांच्या फेंटॅनिल साठ्याशी संबंधित प्रकरणातही समोर आले आहे. तसेच मेफेड्रोन (MD) उत्पादन आणि तस्करीत त्याची प्रमुख भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 2024 मध्ये मुंबईतील कुर्ला परिसरातून 4 किलो एमडी जप्त केल्यानंतर या प्रकरणात डोलाचा सहभाग उघड झाला होता. पुढील तपासात सांगली, सूरत, यूएई आणि टर्कीपर्यंत पसरलेले नेटवर्क उघडकीस आले.
डोंगरीतून परदेशात, तिथून ड्रग्ज नेटवर्क
मुंबईतील डोंगरी भागाचा रहिवासी असलेला डोला सुमारे दशकभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर तो परदेशातून आपल्या हस्तकांमार्फत ड्रग्ज रॅकेट चालवत होता. दरम्यान, इंटरपोल च्या मदतीने त्याचा मुलगा ताहेर आणि पुतण्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना यूएईतून हद्दपार करण्यात आले होते. सलीम डोलाबाबत माहिती देणाऱ्यास NCBने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या काही वर्षांपासून तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता.
सलीम डोलाच्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीविरोधातील लढ्यात मोठे यश मिळाले असून, या नेटवर्कमधील इतर महत्त्वाच्या धागेदोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

