( नागपूर )
नागपूरात ऐकावं ते नवलच अशी थरारक आणि भावनिक घटना समोर आली आहे. 103 वर्षांच्या वयोवृद्ध आजीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी सुरू असताना त्या जिवंत असल्याचं आढळून आलं. अंत्यविधीच्या तयारीदरम्यान आजीनं अचानक हातपाय हलवायला सुरुवात केल्यानं उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
गंगाबाई साखरे (वय 103) असं या आजीचं नाव आहे. सोमवारी, 12 जानेवारी रोजी रामटेक तालुक्यात ही घटना घडली. मृत झाल्याचा समज झालेल्या गंगाबाई साखरे यांनी अक्षरशः मृत्यूला हुलकावणी देत पुन्हा श्वास घेतल्याने संपूर्ण पंचक्रोशीत आश्चर्य आणि भावनांचा पूर आला.
गेल्या काही दिवसांपासून गंगाबाई साखरे यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असतानाच त्यांनी अन्नपाणीही सोडले होते. सोमवारी, 12 जानेवारी रोजी त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. रामटेक तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नातेवाईक, ग्रामस्थ अंत्यसंस्कारासाठी गोळा झाले.
नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांतून नातेवाईक दाखल झाले होते. तिरडी फुलांनी सजवण्यात आली, गंगाबाईंना तिरडीवर ठेवण्यात आलं आणि अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. अंत्यसंस्काराच्या प्रथेनुसार त्यांना नवीन कपडे परिधान करण्यात आले, हात-पायांची बोटे बांधण्यात आली आणि नाकात कापूस ठेवण्यात आला. कुटुंबीय शोकाकुल वातावरणात एकमेकांना धीर देत होते. याचदरम्यान काही नातेवाईकांना आजीच्या शरीरात हलकी हालचाल जाणवली. नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आजीच्या पायाच्या बोटांची क्षीण हालचाल आली. प्रथम विश्वास न बसल्याने बारकाईने पाहणी करण्यात आली. तात्काळ बोटांची बांधणी सोडण्यात आली, नाकातील कापूस काढण्यात आला आणि तेवढ्यात गंगाबाईंनी दीर्घ श्वास घेतला. सुरुवातीला हा भास असल्याचं वाटलं, मात्र हालचाल वाढत गेल्यानं सर्वांनाच संशय आला. अंघोळ घालण्याच्या वेळी नाकातील कापसाचा बोळा काढताच गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. त्याक्षणी मृत घोषित केलेली आजी जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांना हा प्रसंग पाहून विश्वासच बसत नव्हता, सर्वजण अवाक झाले.
गंगाबाई जिवंत असल्याची खात्री होताच साखरे कुटुंबातील वातावरण क्षणात बदललं. अंत्यसंस्कारासाठी बोलावलेली शववाहिनी परत पाठवण्यात आली, शोक मंडप काढून टाकण्यात आला आणि शोकाचं रूपांतर आनंदात झालं. या अविस्मरणीय क्षणाचा आनंद साजरा करत कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी गंगाबाईंचा 103 वा वाढदिवसही उत्साहात साजरा केला.
ही घटना सध्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून “मृत्यूला हुलकावणी देणारी आजी” म्हणून गंगाबाई साखरे यांची कहाणी सर्वत्र सांगितली जात आहे.

