(पेण)
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरपूर फाटा परिसरातील शितोळेवाडी येथे एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत फेकून दिल्याच्या प्रकरणाचा उलगडा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला आहे. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ जून रोजी शितोळेवाडी गावाच्या हद्दीत मुंबई–गोवा महामार्गालगत वनविभागाच्या जागेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
मृत महिला अंबी जान्या जाधव या पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या काही काळ माहेरी तर काही वेळा पेण परिसरात एकट्याच वास्तव्यास असत. घटनेच्या सुमारे आठ दिवसांपूर्वी त्या स्वतःहून पेण येथे आल्या होत्या. दरम्यान, अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर मारहाण करून गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडीझुडपात टाकून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक मागोवा घेतला असता संबंधित सिमकार्ड धारक भानुदास देवकर (रा. बेलोरा, जि. यवतमाळ, सध्या रा. वायशेत, अलिबाग) यांची ओळख पटली.
भानुदास देवकर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाईल क्रमांक पूर्वी आपल्यासोबत काम करणाऱ्या रामअवतार उर्फ शेरा भाय रामविश्वास केवत (मूळ रा. संता, मध्यप्रदेश, सध्या रा. मुंगोशी क्रशर, ता. पेण) याला दिल्याची माहिती दिली. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी विविध क्रशर खाणींमध्ये शोधमोहीम राबवली.
अखेर रामअवतार उर्फ शेरा याला मुंगोशी येथील एका क्रशर खाणीतून ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत त्याने आपला साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा (रा. मध्यप्रदेश) याच्यासह खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ९ जून २०२६ रोजी अटक केली. अवघ्या २४ तासांत या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि जलद कारवाईमुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी कृत्ये दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

