( कोल्हापूर )
मनी लॉड्रिंगच्या 538 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सायबर भामट्यांनी राजारामपुरी तेराव्या गल्लीत राहणाऱ्या निवृत्त प्राध्यापकाला तब्बल 78 लाख 90 हजार रुपये गंडा घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून 16 लाख 45 हजार रुपये बँकेतून गोठवले आहेत.
सदर सायबर फसवणुकीच्या प्रकरणात वर्षभरात शहरातील पाच निवृत्त अधिकारी व प्राध्यापकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचेही समोर आले असून, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडवली आहे.
29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला. बँक खात्यातील रक्कम संपल्यामुळे प्राध्यापकांने सहकारी मित्रांकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या मागणीमुळे मित्रांना संशय आला आणि सायबर भामट्यांचे कृत्य उघड झाले. दरम्यान, भामट्यांनी प्राध्यापकाकडून 78 लाख 90 हजार रुपये उकळवले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, भामट्यांनी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचा बहाणा करून प्राध्यापक व त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला. “तुमच्या मोबाईल सिम कार्डवर काही तासांत बंद होईल” अशी धमकी देऊन, व्हॉटसअॅप कॉलवर वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.
भामट्यांनी नरेश गोयल यांच्या मनी लॅड्रिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या 538 कोटींच्या फसवणुकीत प्राध्यापकांचा आधारकार्ड वापर झाल्याचे दाखवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवली. त्याचबरोबर नरेश गोयल याचे फोटो पाठवून प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीला दिवसभर व्हॉटसअॅप आणि व्हिडिओ कॉलवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
सायबर भामट्यांनी निवृत्त प्राध्यापकांसह त्यांच्या नातेवाईकांकडे बँक खाते माहिती घेऊन, न्यायालयाचा सेट दाखवून खटल्याची सुनावणी सुरू असल्याचे भासविले. डिजीटल अरेस्टची धमकी देत, प्राध्यापकांची सहमती नसतानाही भामट्यांनी आर.टी.जी.एस. व नेट बँकिंगद्वारे 78 लाख 90 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले, अशी फिर्याद पोलिसांकडे दाखल झाली आहे.

