केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2025-26 शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. CBSE च्या अधिकृत सूचनेनुसार, 3 मार्च 2026 रोजी नियोजित असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
3 आणि 4 मार्च रोजी होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आल्याची चर्चा असली तरी, मंडळाने या निर्णयामागे प्रशासकीय कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुधारित CBSE परीक्षा तारखा (2026)
- 10वीची 3 मार्चची परीक्षा → 11 मार्च 2026
- 12वीची 3 मार्चची परीक्षा → 10 एप्रिल 2026
या बदलाचा थेट परिणाम 10वीच्या जर्मन, तिबेटी, NCC, बोडो, जपानी, स्पॅनिश, काश्मिरी, मिझो आणि Elements of Book Keeping या विषयांच्या परीक्षांवर झाला आहे. तर 12वीच्या Legal Studies या विषयाचा पेपर आता एप्रिल महिन्यात घेतला जाणार आहे.
CBSE बोर्डाच्या मुख्य परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून, 10वीची परीक्षा आता 10 मार्चऐवजी 11 मार्च 2026 रोजी संपेल, 12वीची परीक्षा 9 एप्रिलऐवजी 10 एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहे.
मंडळाने स्पष्ट केले आहे की, 3 मार्च व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. सर्व शाळांनी हा बदल विद्यार्थी व पालकांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश CBSE कडून देण्यात आले आहेत. तसेच, प्रवेशपत्रांवर (Admit Card) सुधारित तारखांची नोंद करण्यात येणार आहे.

