( नागपूर )
अमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन आणि कुटील मार्गांचा वापर करत असल्याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेन लपवून तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या नागपूर युनिटने हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मध्ये सापळा रचत ही कारवाई केली.
राजधानी एक्सप्रेसमध्ये सापळा, महिला अटकेत
संशयित महिला प्रवाशाला नागपूर रेल्वे स्थानकावर अडवण्यात आलं आणि पुढील चौकशीसाठी अजनी रेल्वे स्थानक येथे खाली उतरवण्यात आलं. तिच्या सामानाची तपासणी करताना शॅम्पूच्या बाटल्या संशयास्पदरीत्या जड असल्याचं आढळलं. तपासणीदरम्यान बाटल्यांमधील द्रव काढल्यानंतर आतून 50 सीलबंद कॅप्सूल सापडल्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाचं कोकेन भरलेलं होतं. प्राथमिक चाचणीत हा अमली पदार्थ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
DRI पथकाने 853 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे 4 कोटी 26 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

