(नवी दिल्ली)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल होणार आहेत. राज्यभरात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मंडल आणि ग्राम स्तरावर सुमारे 7 हजार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जिल्हा-तालुका स्तरावर नवे नेतृत्व
या बैठकीत जिल्हा आणि तालुका स्तरावरील संघटन रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात आली असून, त्याच धर्तीवर तालुकाध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. काही निवडक पदाधिकाऱ्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
7 हजार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
या अभियानाअंतर्गत ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, एससी, एसटी, ओबीसी विभागांसह विविध संघटनांमध्ये नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. महिला, मागासवर्गीय, तरुण तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना समान संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. ग्राम पातळीपर्यंत नव्या नेतृत्वाला संधी देऊन पक्षाचा विस्तार करण्याचा उद्देश आहे.
काँग्रेसच्या या मोठ्या संघटनात्मक बदलामुळे महाराष्ट्रातील पक्षरचनेत नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

