(बंगळुरू)
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शिवाजीनगर परिसरात ‘बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालय’च्या संरक्षक भिंतीचा काही भाग अचानक कोसळून 6 वर्षांच्या मुलीसह किमान 7 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत.
भिंत कोसळून मोठी जीवितहानी
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 12 फूट उंच आणि 1 फूट जाडीची ही भिंत सायंकाळी 5.45 च्या सुमारास कोसळली. त्या वेळी पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक भिंतीलगत उभे होते. भिंत कोसळताच 10 ते 12 जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. त्यानंतर आपत्कालीन पथकांनी बचावकार्य हाती घेतले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अचानक पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेक पादचारी आणि फेरीवाले जुन्या भिंतीच्या आडोशाला उभे राहिले होते. काहींनी ताडपत्री लावून आश्रय घेतला होता. मात्र काही क्षणातच भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पाऊस, जोरदार वारा आणि जुन्या भिंतीवर पडलेला अतिरिक्त बांधकामाचा भार यामुळे भिंत कोसळली असावी. अधिकृत तपास सुरू आहे.
घटनेनंतर शहराचे पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्य अद्याप सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने 29 आणि 30 एप्रिलसाठी कर्नाटकातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. हा अंदाज खरा ठरत शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट झाली.
शहरातील शांतीनगर, लालबाग, विल्सन गार्डन, जयनगर, एम.जी. रोड, मल्लेश्वरम आणि बसवनगुडी परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

