(पुणे)
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी संपूर्ण देशभरात सर्वत्र तिरंगा फडकवून देशभक्तीचा उत्साह सुरू असतानाच एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी पिंपरी चिंचवड येथील निगडीमध्ये सेक्टर क्रमांक २७ मधील प्लॉट क्रमांक ६५ समोरील रस्त्यावर, बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये घडली.
प्राथमिक माहितीनुसार, बीएसएनएलच्या चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू होते. चेंबरमध्ये सुमारे तीन फूट पाणी साचलेले होते. चार कंत्राटी कामगार या कामासाठी उपस्थित होते. पहिला कामगार चेंबरमध्ये उतरल्यावर त्याचा श्वास घुटमळू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार उतरला, त्यानंतर तिसऱ्यानेही मदतीचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, चेंबरमध्ये उतरलेले हे तिघेही श्वास गुदमरून मृत्युमुखी पडले.
या दुर्घटनेत दत्ता होलारे, लखन धावरे, साहेबराव गिरसेप यांचा मृत्यू झाला आहे. चौथा कामगार बाहेरच असल्यामुळे तो बचावला. चौथ्या कामगाराने घटनेनंतर आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या या शोकांतिकेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती, आणि स्थानिकांमध्ये संतापाची भावना होती. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, सुरक्षा उपाययोजनांची तपासणी केली जात आहे.

