(गुहागर)
मुंबईहून गुहागरकडे येत असताना प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सुमारे ₹3 लाख 84 हजार 800 किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
फिर्यादी मैथिली मिलिंद आरेकर (वय 51) या आपल्या मुलगा ऋग्वेदसोबत 26 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9 वाजता मुंबईतील वरळी येथून गुहागरकडे निघाल्या होत्या. 27 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 7 वाजता त्या गुहागरला पोहोचल्या. दरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेत ठेवलेले ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’चे पाकीट चोरले.
चोरट्याने लंपास केलेल्या दागिन्यांमध्ये 5 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले यांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत: ₹3,84,800 नोंद करण्यात आली आहे.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच मैथिली आरेकर यांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 27 एप्रिल रोजी रात्री 10:55 वाजता भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 305 (क) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

