(सातारा)
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात काळभैरवनाथाच्या ‘उभ्याच्या नवरात्रा’ची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून अखंडित सुरू आहे. ही परंपरा म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत कठोर नियम पाळत उभे राहून नवस पूर्ण करणे. गावकरी याला केवळ धार्मिक परंपरा मानत नाहीत, तर ती सामाजिक समरसता आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगतात.
साडेतीनशे उंबरठे आणि सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचे ग्रामदैवत काळभैरवनाथ आहे. विशेष म्हणजे, या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रितपणे सहभागी होतो. काळभैरवनाथाच्या जागृत स्थानावर मनोकामना पूर्ण होतात, असा ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे. पांडे गावातील ही परंपरा बारा बलुतेदारांचे गाव आणि हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवते. गावातील मुस्लिम बांधवही या कठोर उपासनेत सहभागी होतात. “देव जाती-पातीचा नसतो,” असे सांगत तेही नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात.
नवरात्रातील उपासनेदरम्यान कडक नियम पाळले जातात. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, हे भक्त नऊ दिवस उभेच राहतात. आधारासाठी केवळ काठीचा वापर केला जातो. चप्पल घालणे, बसणे किंवा पळणे यांना पूर्णपणे बंदी आहे. येथे सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी दोन तास आरती केली जाते. तिखट-मिठाचा वापर, औषधे घेणे हे सर्व टाळले जाते. झोपायचे असल्यास मंदिरातील दोरीवर टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंत टेकून विश्रांती घेतली जाते, परंतु एक पाय नेहमी जमिनीवर ठेवणे बंधनकारक असते. आहार फक्त साबुदाणा खीर, फळे आणि दूध यापुरताच मर्यादित असतो.
गावातील सुमारे ३५० ते ४०० भक्त दरवर्षी हा कठोर उपवास करतात. प्रत्येक भक्त पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसतो आणि आधारासाठी केवळ काठीचा वापर करतो. महिलाही उपवास करतात, मात्र त्या घरीच. नवरात्रभर गावात नारळ फोडण्यास बंदी असते. सकाळ-संध्याकाळ आरती, पालखी प्रदक्षिणा तसेच रात्री भजन, कीर्तन, वाघ्या-मुरळी यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
अष्टमीला देवाचा जागर, नवमीला नवस बोलणे, तर विजयादशमीला सीमोल्लंघनाची प्रथा पार पडते. या वेळी गावातील आबालवृद्ध, महिला आणि सर्व जातीधर्मातील लोक उत्साहाने सहभागी होतात. या अनोख्या परंपरेमुळे पांडे गाव नवरात्रात भाविकांचे केंद्रबिंदू बनते. हजारो भाविक या कठोर तपस्येचा अनुभव घेण्यासाठी येथे गर्दी करतात. आधुनिक विज्ञानयुगात अशा परंपरा वेगळ्या वाटल्या तरी त्यातून संस्कृतीचे जतन, लोकभावनांचा सन्मान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचीती मिळते.

