(मुंबई)
राज्यात तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत ‘महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणा’ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. या धोरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योगवाढीवर भर देण्यात आला आहे.
1.5 लाख रोजगार, 2 लाख युवकांना प्रशिक्षण
या धोरणांतर्गत राज्यात सुमारे 1.5 लाख एआय आधारित रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच भविष्यातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यासाठी 2 लाख युवकांना एआय क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर राज्याने AI क्षेत्रात आघाडी घेणे आवश्यक आहे.
स्टार्टअप्ससाठी 500 कोटींचा व्हेंचर फंड
एआय आधारित स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न तयार करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्यात येणार आहे. यापैकी 250 कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत. याशिवाय उद्योगांना यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
उद्योगांना सवलती, गुंतवणुकीला चालना
एआय क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी वीजदरात सवलत, वीज अनुदान आणि स्टॅम्प ड्युटीत सूट यांसारख्या प्रोत्साहनपर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तसेच राज्यात विशेष इन्व्हेस्टमेंट रिजन विकसित करून मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी एआय आधारित डिजिटल एजंट्स विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. शिक्षण, रोजगार आणि उद्योग क्षेत्रात AI चा वापर वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. स्थानिक भाषांमध्ये डिजिटल डेटा तयार करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये एआय प्रणाली विकसित करण्यास मदत होणार आहे.
नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (Ethical AI) संदर्भात स्वतंत्र आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच स्वदेशी एआय संशोधनालाही आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हे धोरण महाराष्ट्राला डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे नेणारे ठरणार असून रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि नवोन्मेषासाठी मोठ्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

