(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे एका ६६ वर्षीय वृद्धाला सायबर चोरांनी तब्बल ६ लाख ९४ हजार ९९२ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर गॅस बिलाचा स्क्रीनशॉट पाठवणे या वृद्धाला चांगलेच महागात पडले असून, याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय विष्णू धोपटकर (वय ६६, रा. निवेंडी) यांना त्यांच्या मुंबईतील सदनिकेच्या गॅस बिलासंदर्भात एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश प्राप्त झाला. संबंधित बिल त्यांनी आधीच भरले असल्याचे सांगत त्यांनी पेमेंटचा स्क्रीनशॉट त्या क्रमांकावर पाठवला. त्यानंतर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समोरील व्यक्तीने फोन उचलला नाही. काही वेळाने दुसऱ्या क्रमांकावरून कॉल करून गॅस बिलाबाबत विचारणा करत त्यांना फोन ‘होल्ड’वर ठेवण्यास सांगण्यात आले. दरम्यान, स्क्रीनशॉटच्या आधारे आणि फोन होल्डवर असताना तांत्रिक शिताफीचा वापर करून अज्ञात सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक केला. फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून अल्पावधीतच तीन मोठे व्यवहार करण्यात आले. गुगल पे (G-Pay) च्या माध्यमातून एकूण ६ लाख ९४ हजार ९९२ रुपये दुसऱ्या खात्यात वळवून ही फसवणूक करण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धोपटकर यांनी तत्काळ जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

