(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ आणि ७ या विभागांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार देण्याची संधी मिळावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या भागात भाजपा संघटन मजबूत असून कार्यकर्त्यांचा जनतेशी असलेला घनिष्ठ संपर्क आणि विधायक कार्य यामुळे पक्षाला या प्रभागांतून मोठ्या विजयाची शक्यता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ६ मधून प्राजक्ता रूमडे, तर प्रभाग क्रमांक ७ मधून निलेश आखाडे हे उमेदवारीसाठी इच्छुक असून, दोघेही कार्यकर्ते स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे एकत्र येत या दोन्ही प्रभागात एक जागा भाजपा उमेदवाराला देण्यात यावी, असा आग्रह धरला. तसेच, जर जागावाटपात जागा मिळाली नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
ही बैठक माजी महिला ओबीसी जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रूमडे यांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीला शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी “स्थानिक मनोभावना लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ६ व ७ भाजपाला देण्यात यावेत” असा आग्रह केला. या वेळी प्राजक्ता रूमडे आणि निलेश आखाडे यांनी विश्वास व्यक्त केला की, “पक्ष संघटना आमच्या कार्याची दखल घेईल आणि दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाला लढण्यासाठी संधी दिली जाईल.”

