( कोल्हापूर )
नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शाहिद समीर सनदे (वय २२) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून त्यांना भेटीसाठी लॉजवर नेले जात असल्याचा आरोप आहे. तेथे अत्याचार करून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आले आणि नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिरोलीतील शाहीद समीर सनदे याने अनेक तरुणींवर अत्याचार करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचे स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून कबूली दिली आहे.
या प्रकरणात एका पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला. तपासादरम्यान आरोपीने तयार केलेले व्हिडिओ मित्रांना शेअर केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात आणखी १० ते १५ तरुणींचे व्हिडिओ असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी तपास गोपनीय ठेवला आहे.
या प्रकरणी दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. फरार शाहरुख देसाईला पोलिसांनी कराड इथून अटक केली आहे. या प्रकरणी आता आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे इतर युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे. डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि आरोपींचे संपर्क तपासण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
शाहरुख देसाईवरही गुन्हे दाखल होणार
दरम्यान, आरोपी शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. 2022 मध्ये शाहिदने आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. शाहरुख देसाई याच्या विरोधात देखील दोन महिलांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीची शहानिशा करून शाहरुख देसाई याच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. शाहिद आणि शाहरुख हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आहे.
गावात संताप, आंदोलनाची तयारी
या घटनेनंतर पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली आहे. शाहिदच्या वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यात त्यांनी आपल्या मुलाने नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की “माझ्या मुलाने जे नीच कृत्य केले आहे, त्याला आमचा अजिबात पाठिंबा नाही. त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. अशा मुलाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.” मुलाच्या या कृत्यामुळे समाजाची मान खाली गेली असून, त्यांनी हात जोडून सर्व गावकऱ्यांची आणि पीडित कुटुंबांची जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध नोंदवला. रॅली काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला असला तरी परवानगी घेऊन मूक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कडक कारवाईची मागणी
या प्रकरणावर विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही नेत्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ शिरोली पोलीस ठाण्याला निवेदन दिले असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिसांनी इतर संभाव्य पीडितांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

