(नाशिक)
महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. शाकाहारी व्यक्तींना “मासा हा पाण्यातील वनस्पती आहे” असा दावा करत प्रसादाच्या नावाखाली मासे खाण्यास भाग पाडल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. या प्रकरणावरून अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आक्रमक झाली असून, “ही स्पष्ट फसवणूक असून खरातवर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी करण्यात आली आहे.
‘प्रसाद’च्या नावाखाली फसवणूक
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात स्वतःला ज्योतिषी सांगत भविष्यवाणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. विशेषतः जैन धर्मीय व्यावसायिकांना लक्ष्य करून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच, शाकाहारी लोकांना “मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात” असे भ्रामक दावे करून प्रसाद म्हणून मासे खाण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे.
अंनिसची कठोर कारवाईची मागणी
अंनिसचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शाकाहार-मांसाहार हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे म्हटले आहे. तपासात अशोक खरात याने अंधश्रद्धा आणि धार्मिक भावनांचा फायदा घेत अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याने कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात आता आयकर विभागही सक्रिय झाला असून खरातच्या उत्पन्नाचे स्रोत, आयकर विवरणपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक सहाय्य करणाऱ्यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच, कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवण्याचा संशयही तपासात आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारवायांबाबत पोलिस तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरात वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकांचा वापर करून राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती आणि सर्वसामान्यांशी संपर्क साधत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये व्हीआयपी क्रमांकाचा वापर तो बडे नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी करत होता. जमीन व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीसाठी स्वतंत्र दुसरा क्रमांक, निवडक महिला व भक्तांसाठी तिसरा, तर सर्वसामान्य भक्तांसाठी चौथा क्रमांक वापरला जात होता.
विशेष म्हणजे, व्हीआयपी क्रमांकाच्या माध्यमातून खरातने राज्यातील तब्बल 45 बड्या नेत्यांशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले आहे. या यादीत आमदार, खासदार तसेच आजी-माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यापैकी किमान तीन बडे नेते खरातसोबत आर्थिक व्यवहारात गुंतले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून याबाबत सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन बँक खात्यांतून 2021 ते 2025 या कालावधीत खरातने लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचेही तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून संबंधितांची अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांची जगदंब सहकारी पतसंस्था आणि अरविंद बावके यांच्या समता सहकारी पतसंस्थेत वारसदार (नॉमिनी) म्हणून नोंद असलेल्या खरातने या दोन्ही संस्थांतील खात्यांमधून अनुक्रमे 50 आणि 48 आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांमध्ये प्रतिभा चाकणकर यांची खातीही समाविष्ट असल्याचे समजते.
तपासात पुढे असेही स्पष्ट होत आहे की, खरात केवळ महिलांचे शोषण करत नव्हता, तर जमीन खरेदी-विक्री आणि आर्थिक फसवणुकीचे जाळेही त्याने मोठ्या प्रमाणावर उभे केले होते. विशेष म्हणजे, त्याने प्रभावशाली व्यक्तींचे मोबाईल क्रमांक त्यांच्या मूळ नावाने सेव्ह न करता कोडवर्डमध्ये नोंदवले होते, ज्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून अंधश्रद्धा, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार यांचे गंभीर स्वरूप समोर येत आहे.सध्या पोलिसांकडून या सर्व आर्थिक व्यवहारांचा आणि संबंधित संपर्कांचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि आयकर विभागाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

