(मुंबई)
झपाट्यानं वाढणाऱ्या शहरांमुळे लोकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत सांगितलं.
मुख्यमंत्री म्हणाले, “कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्टेशनदरम्यानचा बिझनेस डिस्ट्रिक्ट हा पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी योग्य आहे. भविष्यात बुलेट ट्रेन स्टेशन आणि मुंबई उच्च न्यायालयामुळे या भागात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे विद्यमान वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पॉड टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे.”
सिंगल कार्डवर सर्व सुविधा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, “मुंबईतील सर्व वाहतूक सेवांसाठी एकच कार्ड वापरता यावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सुविधाही मिळाली पाहिजे.” तसंच त्यांनी सुचवलं की, “कुर्ला व वांद्रे स्टेशन परिसराच्या विकासात पॉड टॅक्सीचा समावेश व्हावा. कुर्ला स्टेशनजवळील पोलीस निवासस्थानाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच परिसरात दुसरी जागा द्यावी. तसेच, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील इमारतींना पॉड टॅक्सीने थेट स्टेशनशी जोडावं.”
बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, तसेच प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग उपस्थित होते. या वेळी संजय मुखर्जी आणि देवेन भारती यांनी सादरीकरण केलं.
पॉड टॅक्सी म्हणजे काय?
पॉड टॅक्सी ही लहान आकाराची, पूर्णपणे स्वयंचलित व ड्रायव्हरविरहित इलेक्ट्रिक वाहन आहे. ती ५ ते १० मीटर उंचीवरील विशेष ट्रॅकवर चालतात आणि मर्यादित संख्येनं प्रवासी वाहून नेतात. भारतात सध्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पॉड टॅक्सी प्रकल्प प्रस्तावित आहेत.
पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये
- ड्रायव्हरविरहित तंत्रज्ञान: प्रवास अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम.
- इलेक्ट्रिक वाहनं: पर्यावरणस्नेही, प्रदूषण कमी करणारी.
- पर्सनल रॅपिड ट्रान्झिट (PRT): जलद आणि सोयीस्कर वैयक्तिक प्रवास सुविधा.
- उंचावरील ट्रॅक: रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत.

