( शिर्डी )
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होतात. बुधवारी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना नागार्जुन म्हणाले, “अनेक दिवसांपासून साईबाबांचे बोलावणे येत होते. आज अखेर दर्शनाचा योग आला. समाधी दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद मिळाला.” नागार्जुन यांनी यावेळी 2026 या नवीन वर्षात आपला 100 वा चित्रपट पूर्ण होणार असल्याची घोषणा केली. “नवीन वर्षात माझ्या अभिनय कारकिर्दीचे शतक पूर्ण होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
नागार्जुन हे साईबाबांचे कट्टर भक्त असून त्यांनी 2012 साली ‘शिर्डी साई’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते नियमितपणे शिर्डीला दर्शनासाठी येत असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचे शिर्डी दर्शन झाले नव्हते. “काही दिवसांपासून बाबांचे बोलावणे येत होते आणि आज अखेर दर्शनासाठी आलो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
समाधी दर्शनानंतर नागार्जुन यांनी द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरातही दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नागार्जुन यांचा शाल व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतल्याने नागार्जुन यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

