(मुंबई)
शाळांच्या नावांमधून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘युनिव्हर्सल’, ‘वर्ल्ड’, ‘युरो’ यांसारखे आकर्षक शब्द वापरणाऱ्या शिक्षण संस्थांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभाग यांनी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करत स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे.
या निर्णयानुसार, केवळ IB, Cambridge, IGCSE यांसारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्न किंवा संलग्न होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शाळांनाच अशा शब्दांचा वापर करता येणार आहे. राज्य मंडळ किंवा CBSE संलग्न शाळांना मात्र ‘इंटरनॅशनल’ किंवा तत्सम शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे केवळ नावाच्या आधारे निर्माण होणारा संभ्रम दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नसून, यापुढे नव्याने सुरू होणाऱ्या शाळांनाच हे नियम बंधनकारक असतील. शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते की, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरू होणाऱ्या अनेक शाळा आकर्षक नावांचा वापर करून पालकांना आकर्षित करत आहेत, मात्र प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नसतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, शाळांच्या नावांमध्ये ‘कॉन्व्हेंट’ आणि ‘सैनिकी’ या शब्दांबाबतही स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. ख्रिस्ती धर्मसंघ किंवा नन्स समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांनाच ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरता येईल, तर इतर संस्था, न्यास किंवा कंपन्यांना हा शब्द वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, केवळ मान्यताप्राप्त सैनिकी शाळांनाच ‘सैनिकी’ हा शब्द नावात वापरण्याची परवानगी असेल.
याशिवाय, ज्या शिक्षण मंडळाशी शाळा संलग्न होणार आहे, त्या बोर्डचा उल्लेख शाळेच्या नावात करता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता वाढण्याबरोबरच शाळांच्या नावांमुळे होणारी दिशाभूल मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे शाळांना केवळ आकर्षक नावांवर भर न देता प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देणे भाग पडेल. पालकांसाठीही हा निर्णय दिलासादायक ठरणार असून, शाळा निवडताना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेणे सोपे होणार आहे. आगामी काळात या नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

