(नवी दिल्ली)
आम आदमी पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपामध्ये दाखल झाल्याने पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या सात खासदारांच्या विलिनीकरणाला राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षचे राज्यसभेतील संख्याबळ 113 वर पोहोचले असून, ‘आप’चे बळ घटून केवळ 3 वर आले आहे.
कोणते खासदार गेले भाजपात?
‘आप’चे प्रमुख चेहरा मानले जाणारे राघव चड्ढा यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. या सातपैकी सहा खासदार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आलेले असल्याने राज्यातील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘आप’चा पलटवार, अपात्रतेची याचिका
दरम्यान, संजय सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, पक्षाने संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार या खासदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी कपिल सिब्बल यांसारख्या ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून, “कायद्यानुसार हे खासदार अपात्र ठरू शकतात,” असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
भाजपात प्रवेशानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. त्यांनी आरोप केला की, “अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पक्षात ‘toxic work environment’ निर्माण झाले असून काम करण्यास अडथळे येत होते. तसेच, मी केवळ वैयक्तिक कारकीर्दीसाठी राजकारणात आलो नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींनंतर राज्यसभेतील सत्ता समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय आणि संभाव्य अपात्रता याबाबत पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे

