(ठाणे)
ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी आणि पिढ्यानपिढ्या चवीचा वारसा जपणारी मामलेदार मिसळ आता इतिहासजमा झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील या प्रसिद्ध कॅन्टीनवर पुनर्विकासाच्या कामामुळे अखेर कुलूप लागले असून, ठाणेकर खवय्यांनी यावर तीव्र भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मिसळ मिळणं थांबलं नाही, पण ती मामलेदारची चव, तो माहोल आणि ती रांग आता कायमची हरवली,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
शेवटचा दिवस… आणि डोळ्यांत आठवणी
मागील आठवड्यात कॅन्टीनचा शेवटचा दिवस ठरला. अनेक नियमित ग्राहकांनी येथे येऊन जणू आपल्या घरच्यांनाच निरोप दिला. कोणी शेवटची प्लेट खाताना फोटो घेत होते, तर काहींच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू दाटले. “लहानपणी वडिलांसोबत इथे आलो, नंतर माझ्या मुलांनाही हीच चव दाखवली… पण आता पुढच्या पिढीला काय दाखवायचं?” असा भावनिक सवाल एका ग्राहकाने उपस्थित केला.
ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग
1946 साली सुरू झालेली मामलेदार मिसळ ही केवळ खाद्यपदार्थाची जागा नव्हती, तर ठाणेकरांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती. सकाळच्या न्याहारीपासून ते मित्रांच्या गप्पांपर्यंत, राजकीय चर्चांपासून ते कलाकारांच्या भेटींपर्यंत—प्रत्येक क्षणाचा साक्षीदार हे कॅन्टीन होतं. आज ‘आमंत्रण’ हॉटेलमध्ये पार्सल स्वरूपात मिसळ उपलब्ध असली, तरी “त्या छोट्या जागेत उभं राहून, घाम गाळत, वाट पाहत मिळालेल्या प्लेटची मजा वेगळीच होती,” असं एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं.
कलाकार, राजकारणी आणि रसिकांची आवडती जागा
मामलेदार मिसळ म्हणजे केवळ झणझणीत चव नव्हे, तर ठाण्याची ओळख होती. या ठिकाणी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, लता मंगेशकर, आशा भोसले यांसारख्या कलावंतांपासून ते राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत अनेक जण या मिसळीचे चाहते होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात अनेकदा इथूनच होत असे, आणि परतीच्या वेळी पार्सल सोबत घेणंही त्यांच्या सवयीचा भाग होता.
दरम्यान, नारायण राणे ठाण्यात आल्यानंतर आवर्जून ही मिसळ मागवतात. त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात 500-600 प्लेट मिसळ मागवून सर्वांना मेजवानी दिल्याच्या कथा आजही चर्चेत आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांसारखे नेतेही येथे भेट देत असत.
ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाच्या पुनर्विकासासाठी गेल्या काही महिन्यांपासून पाडकाम सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून आता या कॅन्टीनवरही हातोडा चालवण्यात आला आहे. आधुनिक इमारती उभ्या राहतील, पण “त्या भिंतींना त्या चवीचा आणि भावनांचा गंध येईल का?” हा प्रश्न आता प्रत्येक ठाणेकराच्या मनात आहे.
संघर्षातून उभी राहिलेली यशोगाथा
लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी ‘मामलेदार मिसळ’ला जागतिक ओळख मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. कर्नाटकातून मुंबईत आलेल्या मुर्डेश्वर कुटुंबाने 1946 साली ठाण्यातील तहसील कार्यालयाबाहेर एका छोट्या कॅन्टीनमधून या प्रवासाची सुरुवात केली. 1952 साली वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हा व्यवसाय केवळ टिकवला नाही, तर त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. आज हा ब्रँड ‘आमंत्रण’ हॉटेलसारख्या उपहारगृहांपर्यंत पोहोचला आहे आणि मुंबई-ठाण्यात सुमारे 20 शाखा कार्यरत आहेत.
2 डिसेंबर 2020 रोजी लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे पुत्र दामोदर मुर्डेश्वर ही परंपरा पुढे नेत आहेत. आज मामलेदार मिसळ कॅन्टीन बंद झालं असलं, तरी तिची चव, इतिहास आणि त्या जागेशी जोडलेल्या असंख्य आठवणी कायम ठाणेकरांच्या मनात जिवंत राहणार आहेत.
ठाण्यातील एका युगाचा शेवट झाला असला, तरी ‘मामलेदार मिसळ’ ही केवळ एक डिश नसून, एक गोड आठवण आहे अशी भावना अनेक खवय्यांनी व्यक्त केली.

