(दापोली)
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत घटकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
भि. रा. इदाते यांच्या दीर्घकालीन समाजसेवेची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2028 या कालावधीत महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभर विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असून समितीत देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीत माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, खासदार तसेच विविध केंद्रीय आयोगांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे.
या समितीच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा देशभर प्रसार करत द्विशताब्दी वर्ष व्यापक पातळीवर साजरे करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

