( इचलकरंजी )
इचलकरंजी शहरात वास्तूशांती कार्यक्रमादरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून विजेचा धक्का लागल्याने १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहान शहाबाज शेख असे मृत मुलाचे नाव असून तो कागल येथील शाहूनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वास्तूशांती कार्यक्रमावर शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विहान हा त्याची आई फरीदा शहाबाज शेख, आजोबा इकबाल आणि आजी रमिजा यांच्यासोबत नातेवाईकांच्या वास्तूशांती कार्यक्रमासाठी इचलकरंजीत आला होता.
कार्यक्रम सुरू असताना विहान पाणी पिण्यासाठी एका फॅनजवळ गेला. यावेळी तेथे असलेल्या फॅनला जोडलेल्या विजेच्या सॉकेटला त्याचा पाय लागला. अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो मोठ्याने ओरडत खाली कोसळला. हा प्रकार पाहताच उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच विहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मृतदेह आयजीएम रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे करण्यात आली असून इकबाल मियालाल मुजावर यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

