(पालघर)
विरारमधील दोन तरुणांच्या आत्महत्येच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. सोमवारी रात्री बोळींज येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. मृतांमध्ये शाम घोरई (२०) आणि आदित्य सिंग (२१) या दोन जिवलग मित्रांचा समावेश आहे. दोघेही नालासोपारा येथील आचोळे भागात राहत होते आणि राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात शिक्षण घेत होते.
घटनेनंतर मुलांच्या पालकांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणात पेच निर्माण झाला होता. मात्र पोलिस तपासात एक आत्महत्येची चिठ्ठी सापडल्याने प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे.
आदित्यच्या चिठ्ठीत प्रेमभंगाचा उल्लेख
पोलिसांना आदित्यच्या घरातून एका पुस्तकात त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने एका मुलीवर प्रेम असल्याचे आणि ती दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंधात असल्याने तो नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.
शामच्या मृत्यूचं गूढ कायम
तथापि, शामने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दोन शक्यता व्यक्त केल्या आहेत, शामने जिवलग मित्रासाठी जीव दिला असावा, किंवा आदित्यला वाचवण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने खाली पडला असावा.
पोलिसांचा खुलासा
या प्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले की, या घटनेत घातपाताचा किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. तपास अद्याप सुरू असून दोघांच्या मोबाईल आणि सोशल मीडिया संवादाची तपासणी सुरू आहे.

