(मुंबई)
आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (BPT) जमिनीवर सवलतीच्या दरात भूखंड देण्याच्या खोट्या आश्वासनावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेला या दुसऱ्या गुन्ह्यात प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर ही कारवाई झाली. त्याने अनेक व्यक्तींना उच्च अनुदानित दरात भूखंड देण्याचे आमिष दाखवले, बनावट कागदपत्रे आणि बनावट करार करून त्यांना पटवून दिले.
पुरुषोत्तम चव्हाण सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच, बुधवारी त्यांना दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, २४ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नेमकं काय आहे प्रकरण?
सुरत येथील एका व्यावसायिकाला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भूखंडावर स्वस्त दरात मालमत्ता मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत, पुरुषोत्तम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ७.४२ कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी नाशिक पोलीस प्रशिक्षण अकादमीसाठी टी-शर्ट पुरवठा कंत्राट मिळवून देण्याचेही प्रलोभन दाखवले होते. या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून चव्हाणविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या गुन्ह्यात ते आधीपासून न्यायालयीन कोठडीत असून, आता त्यांना दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
EOW चा आरोप काय आहे?
आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपासानुसार, पुरुषोत्तम चव्हाण यांनी भिवंडी, पुणे, पनवेल आणि शिवडी येथील सरकारी घरे आणि भूखंड स्वस्त दरात मिळवून देण्याचं खोटं आश्वासन गुजरातमधील अनेक व्यापाऱ्यांना दिलं होतं. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींसह, अन्य शासकीय मालमत्तांच्या बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करण्यात आली होती.
आधीच्या गुन्ह्यांतूनही अडचणीत
मे २०२४ मध्ये २६३ कोटींच्या TDS घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये, EOW ने त्यांच्याविरोधात आणखी दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. तेव्हा त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे येथील शासकीय कोट्यातील घरे सवलतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत २० लोकांची २४.७८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता.
पत्नीचे बँक खातेही वापरले
या प्रकरणात चव्हाण यांच्या पत्नी, आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याच बँक खात्यात २.६४ कोटी रुपये जमा झाल्याचं निदर्शनास आलं, जे पुरुषोत्तम चव्हाण यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवले, असा दावा आहे. मात्र या व्यवहारात त्यांना मोठा तोटा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याचे समजते. यामध्ये करंदीकर यांच्या खात्यांचा प्रत्यक्ष व्यवहार चव्हाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तपास अधिक खोलात सुरू असून, चव्हाणविरोधात आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे.