(दापोली)
दापोली तालुक्यातील पालगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालगड सुतारवाडी येथे सुरू असलेल्या लग्नाच्या हळदी समारंभादरम्यान ६५ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत सिताराम पांचाळ (वय ६५, रा. पालगड गुजरवाडी, ता. दापोली) हे २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता पालगड सुतारवाडी येथे कल्पेश दिपक देवघरकर यांच्या लग्नाच्या हळदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. काही क्षणांतच ते बेशुद्ध झाल्याने
उपस्थितांमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली. तातडीने त्यांना पालगड येथील स्थानिक डॉक्टर किशोर फडके यांच्याकडे नेण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना त्वरित दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. सदर घटना २५ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे २.०२ वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आली.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे पालगड तसेच सुतारवाडी परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

